छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेने सलग दोन महिने शास्तीवर सवलत देत यंदा २०० कोटी रुपये कर वसुलीचा टप्पा गाठला आहे. आता कर वसुलीचे मिशन मार्चएण्ड अंतिम टप्प्यात असून, २४ दिवसांत तब्बल २२१ कोटी रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर थकीत ९ कोटी २२ लाख रुपयांच्या करापोटी ७१ मालमत्ता महापालिकेने सील केल्या आहेत.
महानगरपालिकेने कर वसुलीत यंदा विक्रमी कामगिरी करीत १ एप्रिल २०२५ ते २५ मार्च २०२६ या ११ महिने २५ दिवसांत २२१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यात मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये तसेच पाणीपट्टीपोटी २१ कोटी रुपयांचा समावेश आहे.
आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कर मूल्यनिर्धारक व संकलन विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. मनपा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. याबाबत महापालिकेचे उपायुक्त नवाळे यांनी सांगितले की, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूक्ष्म नियोजन व प्रभावी मार्गदर्शनामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे.








